नवी दिल्ली- दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धा ही, भारतात दिवस-रात्र खेळली जाणारी एकमेव स्पर्धा आहे. यामुळे या स्पर्धेत देशभरात होणाऱ्या प्रथमश्रेणीतील आघाडीचे खेळाडू सहभागी होत असतात. ही स्पर्धा मागील तीन सत्रांमध्ये गुलाबी चेंडूने खेळवण्यात आली होती. मात्र यंदाच्या सत्रात ही स्पर्धा थेट प्रक्षेपणाच्या अभावाने लाल चेंडूने खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) संचालक सबा करिम यांनी या स्पर्धेच्या संदर्भात माहिती दिली. ते म्हणाले, ही स्पर्धा १७ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीमध्ये बंगळुरुमध्ये रंगणार आहे. या स्पर्धेत तीन संघाचा सहभाग असणार आहे. या स्पर्धेतील अंतिम लढत सोडल्यात इतर सामन्यांमध्ये लाल चेंडू वापरण्यात येणार आहे. स्पर्धेची अंतिम लढत ५ ते ९ सप्टेंबर या दरम्यान होणार असून या सामन्यात गुलाबी चेंडू वापरण्यात येईल. यंदा स्पर्धेचे थेट प्रक्षेपण होणार नसल्याने, लाल चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेमधील सहभागी संघाची नावे इंडिया ब्लू, इंडिया ग्रीन आणि इंडिया रेड अशी आहेत. या संघाचे नेतृत्व अनुक्रमे शुभमन गिल, फैज फजल, प्रियांक पांचाळ याच्याकडे सोपवण्यात आली आहे.