अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामातील दुसरा क्वालिफायर सामना दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज खेळला जाणार आहे. अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्यात हैदराबादचे पारडे जड मानले जात आहे. कारण त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी नोंदवली आहे. तर दुसरीकडे दिल्लीच्या कामगिरीत सातत्याचा अभाव पाहायला मिळत आहे.
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबादचे पारडे जड.... हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने खेळाडूंचा योग्य वापर करत एलिमिनेटरमध्ये बंगळुरुचा पराभव केला. दुसरीकडे, दिल्लीचा संघ साखळीच्या पहिल्या टप्प्यात नऊपैकी सात सामने जिंकून जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात होता. मात्र त्यानंतर दिल्लीची कामगिरी खालावली आणि पुढील सहा सामन्यांपैकी पाच सामने त्यांनी गमावले.
दिल्लीसाठी आघाडीची फळी डोकेदुखी
मागील काही सामन्यात शिखर धवन चार वेळा, पृथ्वी तीनदा आणि रहाणे दोनदा शून्यावर बाद झाला आहे. श्रेयस अय्यर, मार्कस स्टायनिस सातत्याने धावा करत आहेत. हेटमायरकडून मोठ्या खेळीची आपेक्षा दिल्ली संघाची असणार आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडा, एनरिक नॉर्जिया आणि रविचंद्रन अश्विन प्रभावी मारात करत आहेत. पण डावखुरा वेगवान गोलंदाज डॅनियन सॅम्स महागडा ठरला आहे.
हैदराबादचा समतोल संघ
दुसरीकडे मागील चार सामन्यात हैदराबादची फलंदाजी चांगली झाली आहे. वॉर्नरने वृद्धिमान साहाच्या साथीने सलामी दिली होती. पण दुखापतीमुळे बंगळुरुविरुद्धच्या सामन्याला मुकलेला साहा दिल्लीविरुद्धही खेळू शकणार नाही. मनीष पांडे, केन विल्यमसन धोकादायक सिद्ध होत आहे. जेसन होल्डर अष्टपैलूत्व सिद्ध करत आहे. राशिद खानच्या फिरकीचा सामना करणे दिल्लीला आव्हानात्मक ठरणार आहे. टी. नटराजन आणि संदीप शर्मा टिच्चून गोलंदाजी करीत आहेत. पण, मधल्या फळीतील प्रियम गर्ग आणि अब्दुल समद यांचा अनुभव हे हैदराबादचे कच्चे दुवा आहे.
दिल्ली कॅपिटल्सचा संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), कागिसो रबाडा, मार्कस स्टायनिस, संदीप लामिच्छाने, अजिंक्य रहाणे, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, अॅलेक्स केरी, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, ललित यादव, अवेश खान, अक्षर पटेल, तुषार देशपांडे, ऋषभ पंत, हर्षल पटेल, किमो पॉल, एनरिक नॉर्जिया, डॅनियल सॅम्स.
सनरायझर्स हैदराबादचा संघ -
डेव्हिड वार्नर (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विल्यमसन, मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी, विराट सिंह, प्रियम गर्ग, वृद्धीमान साहा, अब्दुल समद, विजय शंकर, मोहम्मद नबी, राशिद खान, जेसन होल्डर, अभिषेक शर्मा, बी संदीप शर्मा, संजय यादव, फॅबियन अॅलेन, पृथ्वी राज यरा, खलील अहमद, संदीप शर्मा, शाहबाज नदीम, सिद्धार्थ कौल, बिली स्टानलेक, टी नटराजन आणि बासिल थम्पी.