अबुधाबी - बाद फेरीच्या शर्यतीत कायम असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाला आज चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागणार आहे. तर चेन्नई संघ या सामन्यात प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार आहे. उभय संघात डबल हेडरमधील पहिला सामना दिवसा खेळला जाणार असून या सामन्याला ३ वाजून ३० मिनिटांनी सुरुवात होईल.
पंजाबला विजयी धडाका राजस्थानने रोखला. रॉयल्सनी पंजाबचा ७ गड्यानी पराभव करत मोठा धक्का दिला. के. एल. राहुलच्या संघाने सलग पाच सामने जिंकत प्ले ऑफसाठी दावेदारी सादर केली होती. मात्र, राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर पंजाबचे भविष्य मात्र अधांतरी झाले आहे. जर चेन्नईविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर त्यांना बाद फेरीसाठी अन्य सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. पंजाबचा संघात मयांक अग्रवालची वापसी होऊ शकते. याशिवाय संघात कोणत्याही बदलाची शक्यता कमी आहे.
दुसरीकडे चेन्नईच्या संघाकडे गमावण्यासारखे काहीच नाही. ते आधीच स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. त्यासाठी हा सामना औपचारिक असला तरी ते इतर संघाचे गणित बिघडवू शकतात. त्यांनी मागील सामन्यात कोलकाताचा पराभव करत कोलकाताला अडचणीत आणले. आता पंजाबचे गणित ते विस्कटू शकतात. चेन्नई विजयी संघासह आजच्या सामन्यात उतरू शकते. युवा खेळाडूंवर चेन्नईची भिस्त असेल.