अबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर बंगळुरू यांच्यात सामना होत असून दोन्ही संघांचे लक्ष प्ले ऑफ फेरीतील स्थान पक्के करण्याचे आहे. यामुळे हा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्यामुळे सलग तिसऱ्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
मुंबईचा संघ १४ गुणांसह, नेटरनरेटच्या जोरावर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहेत. विराटच्या नेतृत्वाखालील आरसीबीच्या खात्यावरही १४ गुण आहेत. आजचा सामना जिंकणारा संघ १६ गुणांसह प्ले-ऑफमधील स्थान पक्के करेल. दरम्यान, मुंबई संघाला यापूर्वीच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध ८ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर दुसरीकडे रविवारी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध बंगळुरूचा पराभव झाला होता.
रोहितच्या खेळण्याबाबत शंका -
बंगळुरूविरुद्धच्या सामन्याला रोहित शर्मा मुकण्याची शक्यता आहे. स्नायूच्या दुखापतीमुळे तो यापूर्वीच्या दोन सामन्यांना मुकला आहे. अद्याप तो दुखापतीतून सावरलेला नाही. पण त्याने सोमवारी नेट्समध्ये सराव केला. योगायोगाने त्याच दिवशी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या संघात त्याची निवड झाली नाही.
मुंबईचा समतोल संघ -
रोहितच्या अनुपस्थितीचा परिणाम मुंबईच्या कामगिरीवर झालेला नाही. इशान किशन, क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, सौरभ तिवारी यांनी आक्रमक फलंदाजीसह मुंबईच्या फलंदाजीची धुरा सांभाळली आहे. याशिवाय हाणामारीच्या षटकांत हार्दिक पांडय़ा केरॉन पोलार्ड यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. मोक्याच्या क्षणी कृणाल पांडय़ासुद्धा उपयुक्त ठरला आहे. गोलंदाजीत मागील राजस्थानचा सामना वगळता, बुमराह, बोल्ट जोडीने भेदक मारा केला आहे. जेम्स पॅटिन्सन आणि नॅथन कोल्टर-नाइल यांच्यापैकी एकाची तिसऱ्या स्थानासाठी निवड होईल.
विराट-डिव्हिलियर्सवर नजरा -
दुसरीकडे, बंगळुरुच्या फलंदाजीची भिस्त विराट कोहली, अॅरोन फिंच, देवदत्त पडिक्कल आणि एबी डिव्हिलियर्स यांच्यावर आहे. मधल्या फळीत ख्रिस मॉरिस, मोइन अली आणि गुरकिराट मान यांचा समावेश आहे. मोहम्मद सिराज इसुरू उडाना यांच्यावर गोलंदाजीची भिस्त आहे. त्यांना युजवेंद्र चहल आणि वॉशिग्टन सुंदरची साथ आहे.
- मुंबई इंडियन्सचा संघ -
- रोहित शर्मा, आदित्य तारे, अनमोलप्रीत सिंह, अनुकुल रॉय, ख्रिस लिन, धवल कुलकर्णी, दिग्विजय देशमुख, हार्दिक पांड्या, ईशान किशन, जेम्स पॅटिंन्सन, जसप्रीत बुमराह, जयंत यादव, केरॉन पोलार्ड, कृणाल पांड्या, मिशेल मॅक्लेनगन, मोहसिन खान, नाथन कॉल्टर नाइल, प्रिंस बलवंत राय, क्विंटन डी कॉक, राहुल चाहर, सौरभ तिवारी, शेरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव आणि ट्रेंट बोल्ट.
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
- अॅरोन फिंच, देवदत्त पडिक्कल, पार्थिव पटेल, विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स, गुरकीरत सिंह, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, नवदीप सैनी, डेल स्टेन, युजवेंद्र चहल, अॅडम झम्पा, इसुरु उदाना, मोईन अली, जोश फिलिप, पवन नेगी, पवन देशपांडे, मोहम्मद सिराज आणि उमेश यादव.