आबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात युवा खेळाडूंनी केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघ अजेय असून त्यांनी पहिले दोन सामने जिंकत गुणातालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. त्यांचा आज सनरायजर्स हैदराबादशी सामना होणार आहे. हैदराबादचा संघ आपले दोन्ही सामने गमावल्याने, गुणातालिकेत तळाला आहे. आज सनरायजर्स हैदराबादविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजयी सातत्य कायम राखण्याचे ध्येय दिल्ली कॅपिटल्सचे असणार आहे. तर दुसरीकडे हैदराबाद संघ विजयासह पुनरागमन करण्यास प्रयत्नशील आहे.
आजच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजीची मदार शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांच्यावर असणार आहे. महत्वाचे म्हणजे हे खेळाडू उपयुक्त खेळी करत दिल्लीच्या विजयात योगदान देत आहेत. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या फटकेबाजीमुळे तसेच शिमरॉन हेटमेयरच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी अधिक भक्कम झाली आहे. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनला दुखापत झाली असल्यामुळे तो हैदराबादविरुद्धच्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्यामुळे वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा, ऑनरिख नॉर्किआ तसेच फिरकीपटू अक्षर पटेल आणि अमित मिश्रा यांना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.