आबुधाबी - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज डबल हेडरमध्ये, सलग तीन पराभव स्वीकारणाऱ्या किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर कोलकाताचे खडतर आव्हान आहे. पंजाबला कोलकाताविरुद्ध विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. दुसरीकडे, काही सामन्यात निराशाजनक कामगिरी केली असली तरी, केकेआर संघ विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये सामील आहे.
पंजाबचे केएल राहुल व मयांक अग्रवाल चांगली सुरुवात करण्यास सक्षम आहेत. तसेच आजच्या सामन्यात ख्रिस गेलला संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे पंजाबची फलंदाजी अधिक मजबूत होईल. याचे संकेत अनिल कुंबळेने दिले आहे. पंजाबचे सलग तीन पराभवांमुळे मनोधैर्य ढासळले आहे. तसेच ग्लेन मॅक्सवेलला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. तसेच त्यांची गोलंदाजी ही चिंतेचा विषय आहे. शमी वगळता अन्य गोलंदाज प्रभावी मारा करण्यात अपयशी ठरले आहेत.
दुसरीकडे, चेन्नईविरुद्धच्या विजयाने केकेआरचे मनोबल वाढले आहे. शुबमन, राहुल त्रिपाठी हे शानदार कामगिरी करत आहेत. तसेच इयॉन मॉर्गन, नितीश राणा हे देखील सातत्याने धावा करत आहे. पण, कर्णधार दिनेश कार्तिक आणि आंद्रे रसेल यांना अद्याप सूर गवसलेला नाही. गोलंदाजीत पॅट कमिंन्स, नागरकोटी, शुभम मावी, सुनील, वरुण प्रभावी मारा करत आहेत.