नवी दिल्ली -आयपीएलच्या आगामी हंगामासाठी चेन्नई येथे 18 फेब्रुवारी रोजी मिनी लिलाव घेण्यात आला. या लिलावात अनेक खेळाडू चर्चेत होते. त्यात भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनचाही समावेश होता. सचिन मुंबई इंडियन्समधून खेळल्याने आणि त्याची संघाप्रती जवळीक पाहता अर्जुनवर मुंबईचा संघ बोली लावणार, असा अंदाज लिलावापूर्वी व्यक्त केला जात होता. २० लाखांच्या बेस प्राईजवर अर्जुनला मुंबई संघात सामील करण्यात आले. त्यानंतर सोशल मीडियावर अर्जुनला मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आले. त्याच्यावर घराणेशाहीचा टॅगही लावण्यात आला.
मात्र, बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरने त्याच्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. अर्जुनला ट्विटरवर ट्रोल करणार्या लोकांना फरहानने फटकारले आहे. ''अर्जुन तेंडुलकरबद्दल मला काही सांगायचे आहे. आम्ही बर्याच वेळा एकाच जिममध्ये गेलो आहोत. त्याच्या फिटनेसवर तो किती कठोर परिश्रम घेतो हे मी पाहिले आहे. तो नेहमीच एक चांगला क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न पाहतो. एखाद्या युवावर घराणेशाहीचा टॅग लावणे चुकीचे आहे. त्याचा उत्साहाचा खून करू नका, उठण्यापूर्वी त्याला दाबू नका'', असे फरहानने म्हटले आहे.