मुंबई - जसप्रीत बुमराहच्या पारंपरिक चौकटीबाहेरच्या गोलंदाजीमुळे तो जगातील एक धोकादायक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात बुमराहने भारतीय संघात पदार्पण केले. पण, बुमराहने पदार्पणाच्या सामन्यात धोनीचा सल्ला ऐकला नव्हता, याची खुद्द कबुली बुमराहनेच दिली.
बुमराह एका इंग्रजी माध्यमाशी बोलताना म्हणाला की, पदार्पणाच्या सामन्यात मी कर्णधार धोनीशी बोललो. यात मी त्याला विचारले की, डेथ ओव्हरमध्ये यॉर्कर लाईनवर गोलंदाजी करु का? यावर धोनीने, करु नको, असा सल्ला दिला. पण मी माझ्या पद्धतीनेच यॉर्कर लाईन गोलंदाजी केली. माझी गोलंदाजी पाहून धोनीने माझे कौतूक केले.
धोनी त्यावेळी म्हणाला की, तुला याआधीच भारतीय संघात यायला हवे होते. आपण ही मालिका जिंकू शकलो असतो. पहिलाच सामना होता, यामुळे मी आधीच नर्वस होतो. त्यात खुद्द कर्णधारच स्तुती केल्याने, मला आनंद झाला, असेही बुमराह म्हणाला.