मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघाने शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धचा सामना तर गमावलाच त्यासोबत त्यांना दंड देखील भरावा लागला आहे. आयपीएलच्या गर्व्हनिंग काऊंन्सिलने चेन्नईला १२ लाखांचा दंड ठोठावला आहे.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यात 'स्लो-ओव्हर रेट'चा ठपका चेन्नई सुपर किंग्ज संघावर ठेवण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार एका तासात एका डावात किमान १४.१ षटकांचा खेळ होणे बंधनकारक आहे. चेन्नईच्या संघाने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात फक्त १८.४ षटकेच फेकली. दिल्लीने १९ व्या षटकातच चेन्नईने दिलेले लक्ष्य गाठले होते. पण चेन्नईने षटके पूर्ण करण्यासाठी निर्धारित वेळेपेक्षा जास्त वेळ घेतल्याने आयपीएलकडून दंडाची कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, चेन्नईची या हंगामातील ही पहिलीच चूक असल्याने त्यांना केवळ १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. पण दुसऱ्यांदा अशी चूक केल्यास दंडाची रक्कम २४ लाख, तर तिसऱ्या वेळेस ३० लाखांचा दंड ठोठावण्यात येऊ शकतो. इतकेच नव्हे तर एका सामन्याची बंदी देखील येऊ शकते.