मुंबई - भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्रसिंह धोनी इंग्लंड विश्वकरंडकापासून संघाबाहेर आहे. त्याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना विश्वकरंडकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. यानंतर निवड समितीने धोनीला संघात जागा दिली नाही. धोनी आयपीएलच्या माध्यमातून टीम इंडियात परतण्यासाठी आतूर आहे. पण कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा होणार की नाही, याबाबत कोणताच ठोस निर्णय बीसीसीआयकडून अद्याप घेण्यात आलेला नाही. दरम्यानच्या काळात धोनी निवृत्ती स्वीकारणार, अशा चर्चांना ऊत आला. धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने धोनीच्या निवृत्तीवर त्याचे व्यक्त केले आहे.
एका क्रीडा वाहिनीशी बोलताना नासिर हुसेन म्हणाला, 'महेंद्रसिंह धोनीसारखा खेळाडू क्वचितच मिळतो. यामुळे धोनीवर निवृत्तीसाठी दबाव निर्माण करणाऱ्यांनी विचार केला पाहिजे. धोनी सद्य घडीलाही भारतीय संघासाठी मोलाचे योगदान देऊ शकतो.'
धोनी गेल्यानंतर त्याच्यासारखा खेळाडू भारतीय संघाला मिळणार नाही. त्याच्यावर निवृत्तीसाठी दबाव टाकणे योग्य नाही. फक्त धोनीलाच महिती आहे की तो कोणत्या स्थितीमध्ये आहे. निवड समितीलाच निर्णय घ्यावा लागणार आहे, खेळाडूंना संधी द्यायची की नाही. संधी मिळाली तरच खेळाडू आपली प्रतिभा दाखवतील, असेही हुसेन म्हणाला.