सिडनी - 'धोनी बेस्ट फिनिशर आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला सध्या त्याच्यासारख्या खेळाडूंची गरज आहे', असे मत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी दिले. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेत कांगारूंना ०-३ असा मानहानीकारक पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांच्या नजरा आता न्यूझीलंडविरूद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेवर असणार आहेत.
हेही वाचा -रोड सेफ्टी विश्व सिरीज : भारताचा सलग दुसरा विजय, इरफानची 'पठाणी' खेळी
'आम्ही भाग्यवान आहोत की यापूर्वी आमच्याकडे माइक हसी किंवा मायकेल बेव्हनसारखे खेळाडू होते जे सामना संपवण्यात तरबेज होते. धोनीचीही यात हुकूमत आहे. इंग्लंडकडून जोस बटलरने शानदार कामगिरी केली आहे', असे लँगर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले.
दरम्यान, धोनी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडकानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे भारतीय संघात महेंद्रसिंह धोनीला पुन्हा पाहण्यासाठी त्याचे चाहते आतूर झाले आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनीला भारतीय संघात पुनरागमन करायचे असेल तर त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करायला हवी. आयपीएलमध्ये त्याने चांगली कामगिरी केल्यास तो संघात पुनरागमन करेल अन्यथा त्याच्यासाठी भारतीय संघाचे दरवाजे जवळपास बंद होतील.