मुंबई- भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी सद्या क्रिकेटपासून लांब आहे. तो पुन्हा कधी मैदानात परतणार याची चाहते उत्सुकतने वाट पाहत आहेत. धोनी संघाबाहेर असूनही नेहमी चर्चेत असतो. सोशल मीडिया धोनीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात तो आपल्या सहकाऱ्यांसोबत चक्क बाथरुममध्येच गाण्याची मैफिल रंगवल्याचे दिसत आहे.
धोनीच्या मैफिलमध्ये पियूष चावला आणि पार्थिव पटेल यांच्यासह अनेक मंडळी चक्क बाथरुममध्ये बसकन मारत मैफिलीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. तर बाथरुम सिंगर ईशान खान 'मेरे महबूब कयामत होगी' हे गीत गात आहे. या गाण्याचा आनंद धोनी घेत आहे.
दरम्यान धोनीने इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्व करंडक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यानंतर एकही सामना खेळलेला नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार धोनी २९ फेब्रुवारीला चेन्नईमध्ये दाखल होणार आहे. यानंतर तो १ मार्चपासून क्रिकेटच्या सरावाला सुरूवात करणार आहे.
एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार धोनी मार्च महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यात सराव करणार आहे. यावेळी धोनीसोबत सुरेश रैना आणि अंबाती रायुडू हेही सराव सत्रात सहभागी होणार आहेत. आयपीएलच्या १३ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा सलामीचा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे. हा सामना २९ मार्चला वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे.