मुंबई - दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेदरम्यान श्रीलंका संघाला एक मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज धनंजया डी सिल्वा दुखापतग्रस्त झाला आहे. यामुळे तो पुढील दोन आठवडे क्रिकेट खेळू शकणार नाही. याचा अर्थ तो, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सुरू असलेल्या दोन सामन्याच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे.
दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी फलंदाजी करताना, डी सिल्वा याच्या मांडीला दुखापत झाली होती. यामुळे त्याला रिटायर्ट हर्ट व्हावे लागले. मैदानाबाहेर जाण्याआधी तो ७९ धावांवर खेळत होता.
पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर डी सिल्वा यांच्या मांडीचा स्कॅन करण्यात आला. तेव्हा यात त्याची दुखापत गंभीर असल्याचे निदर्शनात आले. यावर श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले की, ग्रेड २ टियरच्या कारणामुळे डी सिल्वा दोन आठवड्यासाठी क्रिकेट खेळू शकणार नाही.
सिल्वा मालिकेतून बाहेर गेल्याने हा श्रीलंका संघासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्याच्या जागेवर कोणत्या खेळाडूला संघात स्थान मिळते, हे पाहावे लागेल.