दुबई -शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेला सामना अखेट टाय झाला आणि सुपर ओवर क्रिकेटप्रेमींना अनुभवायला मिळाली. मात्र, सुपर ओवरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने पंजाबवर एकतर्फी विजय मिळवला.
सुपर ओवरसाठी पंजाबकडूनलोकेश राहुल आणि निकोलस पूरन ही जोडी मैदानात आली. दिल्लीकडून गोलंदाज होता कगिसो रबाडा. रबाडाच्या पहिल्या चेंडूवर २ धावा काढल्या. मात्र, दुसऱ्या चेंडूवर कर्णधार लोकेश राहुल बाद झाला तर तिसऱ्या चेंडूवर निकोलस त्रिफळाचित झाला. दोन गडी बाद झाल्यास पुढील चेंडू टाकले जात नाहीत. त्यामुळे दिल्लीला केवळ तीन धावांचे सोपे आव्हान मिळाले. दिल्लीकडून रिषभ पंत आणि श्रेयश अय्यर मैदानात आले. पंजाबकडून गोलंदाज होता मोहम्मद शमी. शमीचा पहिला चेंडू निर्धाव गेला. दुसरा चेंडू वाईड गेला आणि तिसऱ्या चेंडूवर दोन धावा घेतल्याने दिल्ली कॅपिटल्सने आरामात सुपर ओवरमधील हा सामना जिंकला.
या पराजयामुळे पंजाबच्या मयांक अग्रवालची ८९ धावांची शानदार खेळी वाया गेली. त्याने ६० चेंडूत ७ चौकार आणि ४ षटकारांच्या साहाय्याने ८९ धावा केल्या. मंयाक वगळता पंजाबकडून कोणत्याही फलंदाजाला विशेष चमक दाखवता आली नाही. कर्णधार लोकेश राहुल (२१) आणि कृष्णप्पा गौतम (२०) यांनी काही काळ मैदानावर टिकण्याचा प्रयत्न केला.
तत्पूर्वी, अष्टपैलू खेळाडू मार्कस स्टॉइनिसच्या इटपट अर्धशतकामुळे दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ८ बाद १५७ धावा केल्या. मोहम्मद शमीच्या तिखट माऱ्यासमोर दिल्लीचे आघाडीचे फलंदाज ढेपाळले. सलामीवीर पृथ्वी शॉ (५) आणि शिखर धवन (०) अपयशी ठरले. विंडीजचा शिमरोन हेटमायरही ७ धावांवर माघारी परतला. दिल्लीचे १३ धावांवर ३ फलंदाज बाद झाले असताना कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंतने किल्ला लढवला. अय्यरने ३ षटकारांसह ३९ तर, पंतने ४ चौकारांसह ३१ धावा केल्या.
या दोघानंतर आलेल्या मार्कस स्टॉइनिसने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. दुसऱ्या बाजूने अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन हे फलंदाज बाद झाले. मात्र, स्टॉइनिसने धावफलक हलता ठेवला. १५ षटकात दिल्लीच्या ५ बाद ९५ धावा होत्या. मात्र, स्टॉइनिसच्या वादळी खेळीमुळे शेवटच्या ५ षटकात दिल्लीला ६५ धावा करता आल्या. २० व्या षटकात दिल्लीने ३० धावा वसूल केल्या. पंजाबकडून मोहम्मद शमीने १५ धावात ३, कोटरेलने २४ धावात २ तर, बिश्नोईने २२ धावात एक बळी घेतला. पंजाबकडून ख्रिस जॉर्डन सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याच्या ४ षटकात दिल्लीने ५६ धावा केल्या.
LIVE UPDATE :
- सुपर ओवरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय
- सुपर ओवरला सुरुवात
- सामना टाय, सुपर ओवरचा थरार होणार
- पंजाबला विजयासाठी ९ चेंडूत १९ धावांची गरज
- पंजाबला विजयासाठी ३० चेंडूत ६० धावांची गरज.
- १५ षटकानंतर पंजाबच्या ५ बाद ९८ धावा.
- मयंक आणि गौतमने सावरला डाव.
- १० षटकानंतर पंजाबच्या ५ बाद ५५ धावा.
- अक्षर पटेलने सरफराज खानला १२ धावांवर धाडले माघारी.
- सरफराज खान मैदानात.
- अय्यरने घेतला मॅक्सवेलचा झेल.
- कगिसो रबाडाने ग्लेन मॅक्सवेलला धाडले माघारी.
- मॅक्सवेल मैदानात.
- पंजाबच्या ६ षटकात ३ बाद ३५ धावा.
- अश्विनचा दुसरा बळी, निकोलस पूरन शून्यावर माघारी.
- करुण नायरही तंबूत, अश्विनने घेतला बळी.
- पंजाबच्या ५ षटकात १ बाद ३३ धावा
- करुण नायर मैदानात.
- पंजाबच्या ४.३ षटकात १ बाद ३० धावा.
- मोहित शर्माने उडवला राहुलचा त्रिफळा.
- पंजाबला पहिला धक्का, कर्णधार लोकेश राहुल २१ धावांवर माघारी
- पंजाबच्या पहिल्या षटकात बिनबाद ५ धावा.
- दिल्लीकडून शेल्डन एनरिच नोर्ट्जे टाकतोय पहिले षटक.
- लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल पंजाबचे सलामीवीर फलंदाज
- पंजाबच्या डावाची सुरुवात.
- दिल्लीचे पंजाबला १५८ धावांचे आव्हान.
- शेवटच्या चेंडूवर स्टॉइनिस धावबाद, स्टॉइनिसच्या ७ चौकार आणि ३ षटकारांसह २१ चेंडूत ५३ धावा.
- स्टॉइनिसचे २० चेंडूत तडाखेबंद अर्धशतक.
- रविचंद्रन अश्विन ४ धावांवर बाद, कॉटरेलने घेतला बळी.
- १९व्या षटकात स्टॉइनिसचे कॉटरेलला सलग तीन चौकार.
- मार्कस स्टॉइनिसच्या शेवटच्या षटकात उपयुक्त धावा.
- अक्षर पटेल ६ धावांवर माघारी, रविचंद्रन अश्विन मैदानात.
- १५ षटकानंतर दिल्लीच्या ५ बाद ९३ धावा.
- अक्षर पटेल मैदानात.
- दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर माघारी, अय्यरच्या ३२ चेंडूत ३ षटकारांसह ३९ धावा.
- मोहम्मद शमीचा तिसरा बळी.
- मार्कस स्टॉइनिस मैदानात.
- १४ षटकानंतर दिल्लीच्या ४ बाद ८६ धावा.
- पंतच्या खेळीत ४ चौकारांचा समावेश.
- ऋषभ पंत ३१ धावांवर बाद. रवी बिश्नोईने पंतचा अडथळा दूर केला.
- १३ षटकानंतर दिल्लीच्या ३ बाद ७९ धावा.
- अय्यरचे कृष्णप्पा गौतमला लागोपाठ दोन षटकार.
- पंत आणि अय्यरने सावरला दिल्लीचा डाव.
- पंत २ चौकारांसह १७ तर कर्णधार अय्यर एका षटकारासह १६ धावांवर नाबाद.
- दहा षटकात दिल्लीच्या ३ बाद ४९ धावा.
- ५ षटकात दिल्लीच्या ३ बाद २१ धावा.
- ऋषभ पंत मैदानात.
- दिल्लीच्या ४ षटकात ३ बाद १३ धावा.
- मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर मयंकने पकडला हेटमायरचा झेल.
- दिल्लीला तिसरा धक्का, हेटमायर ७ धावांवर माघारी.
- दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर मैदानात.
- दिल्लीच्या ३.३ षटकात २ बाद ९ धावा.
- मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर जॉर्डनने पकडला पृथ्वीचा झेल.
- दिल्लीला दुसरा सलामीवीर माघारी, पृथ्वी ५ धावांवर बाद.
- स्फोटक फलंदाज शिमरोन हेटमायर मैदानात.
- मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेताना धवन धावबाद.
- दिल्लीला पहिला धक्का, शिखर धवन शून्यावर धावबाद.
- पहिल्या षटकात दिल्लीच्या बिनबाद ५ धावा.
- पृथ्वीकडून दिल्लीचा पहिला चौकार.
- पंजाबकडून शेल्डन कॉटरेल टाकतोय पहिले षटक.
- पृथ्वी शॉ आणि शिखर धवन करणार डावाची सुरुवात.
- दिल्लीचे सलामीवीर मैदानात.
- नाणेफेक जिंकून पंजाबचा गोलंदाजीचा निर्णय.
दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग XI -
श्रेयस अय्यर (कर्णधार), कगिसो रबाडा, मार्कस स्टॉइनिस, रविचंद्रन अश्विन, शिखर धवन, शिमरोन हेटमायर, मोहित शर्मा, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, एनरिच नोर्ट्जे, ऋषभ पंत.
किंग्ज इलेव्हन पंजाबची प्लेईंग XI -
केएल राहुल (कर्णधार), ख्रिस जॉर्डन, करुण नायर, ग्लेन मॅक्सवेल, सरफराज खान, शेल्डन कॉटरेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, कृष्णप्पा गौतम, रवी बिश्नोई.