नवी दिल्ली - बांगलादेश विरुध्दच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारतीय गोलंदाज दीपक चहरला एका स्पेलने एका रात्रीत स्टार केले. त्याने नागपुरमध्ये रंगलेल्या या सामन्यात ३.२ षटकात गोलंदाजी करताना ७ धावा देत ६ बळी घेतले. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे भारताने हा सामना जिंकत मालिकेत २-१ बाजी मारली. दरम्यान, चहरने कामगिरीनंतर टी-२० क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे.
दीपक चहरने बांगलादेश विरुध्दच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळताना एकूण ८ बळी घेतले. अखेरच्या निर्णायक सामन्यात तर त्याने ६ बळी घेत सामनावीरचा पुरस्कार पटकावला. तसेच या मालिकेचा मालिकावीर हा पुरस्कारही चहरने मिळवला. त्याला या दमदार कामगिरीचा फायदा आयसीसीच्या क्रमवारीत झाला आहे. त्याने आपल्या आधीच्या क्रमवारीवरून ८८ अंकानी झेप घेत दीपक चहर थेट ४२ व्या स्थानी पोहचला आहे.