नागपूर -आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्या भारतीय हॅट्ट्रिकवीराचा मान नोंदवत दीपक चाहरने भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. नागपूर येथे रंगलेल्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यात भारताने बांगलादेशला ३० धावांनी हरवले आणि मालिका २-१ ने खिशात घातली. या कामगिरीमुळे दीपक चाहरला मालिकावीर आणि सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
हेही वाचा -चीन ओपन : जपानचा केंटो मोमोटा विजेता
आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात हॅट्ट्रिक मिळवणारा दीपक चाहर पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. सोबतच त्याने टी-२० क्रिकेट प्रकारात गोलंदाजीमध्ये सर्वोत्तम फिगर नोंदवली. चाहरने या सामन्यात केवळ ७ धावा देत ६ गडी बाद केले. याआधी हा विक्रम श्रीलंकेच्या अजंता मेंडिसच्या नावावर होता. २०१२ मध्ये त्याने केवळ ८ धावा देत ६ गडी बाद करण्याची किमया केली होती.
विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठास्थित मैदानावर सुरू असलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताच्या १७४ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४४ धावांवर आटोपला. भारताकडून दीपक चाहरने सर्वाधिक ६, शिवम दुबेने ३ तर चहलने १ बळी घेतला.