आबुधाबी - दिल्ली कॅपिटल्सची विजयी घौडदौड सनरायजर्स हैदराबादने रोखली. हैदराबादच्या विजयात अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानने मोलाची भूमिका निभावली. त्याच्या फिरकीपुढे दिल्लीचे फलंदाज हतबल ठरले. राशिदला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. तेव्हा राशिद भावुक झालेला पाहायला मिळाला. या क्षणी मला माझ्या आई-वडिलांची आठवण येत असल्याचे सांगत, त्याने सामनावीरचा पुरस्कार आई- वडिलांना समर्पित केला.
सामनावीरचा पुरस्कार मिळाल्यानंतर राशिद म्हणाला, 'मी कोणतेही दडपण न घेता शांत आणि एकाग्रतेने खेळ करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळेच कदाचित मल यश मिळत असावं. आजचा हा पुरस्कार मी माझ्या आई-वडिलांना समर्पित करतो. मागील दीड वर्ष हे माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होतं. मी प्रथम वडिलांना गमावलं आणि त्यानंतर तीन महिन्यानंतरच आईही मला सोडून गेली. ती आयपीएलची आणि माझी मोठी फॅन होती. हा पुरस्कार त्यांच्यासाठी. मला जेव्हा पुरस्कार मिळायचा, ती पूर्ण रात्र ती माझ्याशी गप्पा मारायची. पण, ती आता या जगात नाही.'