होबार्ट -इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलान बिग बॅश लीगच्या (बीबीएल) आगामी सत्रात होबार्ट हरिकेन्स संघात सामील होईल. सप्टेंबरमध्ये साऊथम्प्टनमध्ये येथे खेळल्या गेलेल्या टी-२० मालिकेत मलानने आयसीसी रँकिंगमध्ये प्रथम स्थान मिळवले होते.
इंग्लंडचा मलान म्हणाला, "बिग बॅश लीग जगातील सर्वोत्तम टी-२० लीगमध्ये गणली जाते. हरिकेन्सशी करार करून मला आनंद झाला आहे. ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांसमोर खेळण्याचा मी आनंद घेतो.''
संघाचे मुख्य प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ म्हणाले, "मलानसारखा प्रतिभावान आणि अनुभवी खेळाडू आमच्या संघात येत आहे याचा मला आनंद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर टी-२० स्वरूपात त्याने चांगली कामगिरी केली आहे. मला आशा आहे, की तो संघात चांगली कामगिरी करेल. जेव्हा तो मिडलसेक्सकडून खेळत होता, तेव्हा मी त्याच्याबरोबर थोडा वेळ घालवला होता.''
सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या आयसीसी टी-२० क्रमवारीत इंग्लंडचा फलंदाज डेव्हिड मलानने अव्वल स्थान मिळवले आहे. त्याने पाकिस्तानच्या बाबर आझमला मागे टाकत ही कामगिरी केली. मलानने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेमध्ये शानदार पदार्पण केले होते.
३३ वर्षीय मलान याआधी पाचव्या स्थानावर होता. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १२९ धावा केल्या. मलानने आतापर्यंत १६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून ४८.७१च्या सरासरीने ६८२ धावा केल्या आहेत. यात एका नाबाद शतकाचाही समावेश आहे. जेसन रॉय आणि बेन स्टोक्सच्या अनुपस्थितीत मलानला पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळण्याची संधी मिळाली होती.