नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान वॉर्नर चाहत्यांसाठी सतत व्हिडिओ-फोटो शेअर करत असतो. आता तो बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबतच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे.
या नव्या व्हिडिओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीला अॅनिमेटेड रूप देण्यात आले असून यात वॉर्नर शिल्पाची कॉपी करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून मला खूप हसू आले आणि खूप आनंदही झाला, असे वॉर्नरने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले. सोबत त्याने शिल्पा शेट्टीलाही टॅग केले आहे.
हा व्हिडिओ यापूर्वी शिल्पाने पती राज कुंद्रासह बनवला होता. तर, वॉर्नरच्या व्हिडिओमध्ये राजला क्रॉप केले गेले आहे.
लॉकडाऊनमध्ये वॉर्नरने अनेक व्हिडिओ पोस्ट केले आहेत. चाहत्यांनाही त्याला खूप प्रतिसाद दिला आहे. यापूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये तो पत्नी कँडिससोबत तेलुगू फिल्मस्टार महेश बाबू यांच्या गाण्यावर नाचताना दिसला होता. कोरोना विषाणूमुळे क्रिकेटच्या अनेक स्पर्धा ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे अनेक क्रिकेटपटू आपल्या घरी वेळ घालवत आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे.