अॅडलेड -पाकिस्तान विरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने पराक्रम केला. गुलाबी चेंडूवर त्रिशतकी खेळी करणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. या सामन्यात वॉर्नरने नाबाद ३३५ धावा केल्या. विशेष म्हणजे, वॉर्नर हा विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या ४०० धावांच्या विक्रमाच्या जवळ येऊन पोहोचला होता. मात्र, डाव घोषित केल्याने तो हा विक्रम मोडू शकला नाही.
हेही वाचा -#HBDMohammadKaif : तो 'अद्भूत' झेल पकडून कैफ ठरला विजयाचा शिल्पकार!
वॉर्नरला ४०० धावांचा विक्रम मोडता आला नसला तरी त्याने भारताच्या रोहित शर्माबद्दल एक भविष्यवाणी केली आहे. फॉक्स स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये लाराचा विक्रम कोण मोडू शकेल याबाबतही त्याने मत व्यक्त केले. 'भारताचा हिटमॅन रोहित शर्मा हा विक्रम मोडू शकतो', असे वॉर्नरने म्हटले आहे.
'ऑस्ट्रेलियामध्ये चौकाराची सीमारेषा लांब आणि मोठी आहे, त्यामुळे कधी-कधी गोष्टी कठीण होतात. मोठी खेळी करताना थकवा येतो, तेव्हा जास्त प्रयत्न करावे लागतात. त्यामुळे मोठे फटके खेळणे अशक्य होऊन जाते. मी शेवटी वेगाने धावा जमवण्याचा प्रयत्न केला. भविष्यात लाराचा विक्रम मोडण्याची क्षमता रोहित शर्मा याच्याकडे आहे', असे वॉर्नरने म्हटले आहे.
विशेष म्हणजे, वॉर्नरची ३३५ ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. या विक्रमासह वॉर्नर ऑस्ट्रेलियाकडून त्रिशतकी खेळी करणारा सातवा फलंदाज ठरला आहे. तसेच त्याने सर डॉन ब्रॅडमन यांचा ३३४ धावांचा विक्रमही मोडीत काढला.