पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद - वेस्ट इंडीजचा संघ मंगळवारी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. पण या दौऱ्यातून डेरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि किमो पॉल या महत्वाच्या तीन खेळाडूंनी माघार घेतली आहे. त्यांनी कौटुंबिक चिंतेमुळे कोरोना महामारीत इंग्लंड दौरा करण्यास नकार दिला आहे.
वेस्ट इंडीज आणि इंग्लंड संघात ८ जुलैपासून तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी २५ सदस्यांचा विंडीजचा संघ मंगळवारी इंग्लंडमध्ये दाखल होणार आहे. पण, या मालिकेतून डेरेन ब्राव्हो, शिमरोन हेटमायर आणि किमो पॉल यांनी ऐनवेळी माघार घेतली आहे.
क्रिकेट वेस्ट इंडीजचे सीईओ जॉनी ग्रेव्ह यांनी सांगितले की, 'तिघेही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटसाठी करारबद्ध आहेत. बोर्ड त्यांच्या भावना समजू शकते आणि त्यांच्यासोबत आमची सहानुभूती आहे. किमो पॉल हा संपूर्ण मोठ्या कुटुंबाचा एकमेव कर्ता पुरुष आहे. तो खरोखर फार चिंताग्रस्त होता. मला काही झाले तर कुटुंबाचे काय होईल, अशी त्याची चिंता आहे. पॉलने बोर्डाला ई-मेल पाठवून इंग्लंड दौऱ्यातून वगळण्याची विनंती केलेली आहे.'