मुंबई - वेस्ट इंडीज संघाने एंटीगा येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा ८ गडी राखून पराभव केला. पण हा सामना एका वादग्रस्त निर्णयामुळे चर्चेत आला आहे. श्रीलंकेचा फलंदाज धनुष्का गुणतिलका याला क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तिसऱ्या पंचांनी बाद दिले. या विषयावरुन वाद सुरू झाला आहे. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान २१ व्या षटकात ही घटना घडली.
काय आहे प्रकरण...
वेस्ट इंडीजचा कर्णधार केरॉन पोलार्ड याने टाकलेल्या चेंडूवर धनुष्का गुणतिलका याने बचावात्मक फटका खेळला. पण तो चेंडू खेळपट्टीवर त्याच्या पायाजवळच राहिला. त्याचवेळी दुसऱ्या टोकाला असलेला निसांका याने धाव घेण्याची अॅक्शन केली. धनुष्का देखील धाव घेण्यासाठी पुढे निघाला. पण त्याने अचानक आपला निर्णय बदलत क्रिजमध्ये परतला. क्रीजमध्ये परतत असताना त्याचा पाय चेंडूला लागला आणि चेंडू त्याच्या पायासोबत मागे आला. तेव्हा पोलार्ड आणि जवळचे वेस्ट इंडीजचे क्षेत्ररक्षक धावबाद करण्याची संधी शोधत चेंडूच्या दिशेने धावत होते. चेंडू गुणतिलकाच्या पायाला लागून मागे जाताच पोलार्डने मैदानावरील पंचांकडे अपील केले. पोलार्डच्या अपीलनंतर मैदानावरील पंचांनी हा निर्णय तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला. तिसऱ्या पंचांनी रिप्ले बघून क्षेत्ररक्षणात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुणतिलकाला बाद दिले. त्यामुळे गुणतिलकाला मैदानातून बाहेर जावे लागले.