नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेचा ३६ वर्षीय जलदगती गोलंदाज डेल स्टेनने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. स्टेन हा जगातील एकमेव वेगवान गोलंदाज आहे, ज्याने कसोटी खेळणाऱ्या ९ देशांविरुद्ध एका डावात ५ गडी बाद करण्याचा पराक्रम केला आहे. स्टेनच्या निवृत्तीच्या घोषणेवर भारतीय कर्णधार विराट कोहलीने ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तो म्हणतो, 'तू या खेळाचा चॅम्पियन आहेस. निवृत्तीनंतर तुझे आयुष्य छान जावो'
डेन स्टेनने जरी कसोटीमध्ये निवृत्ती जाहीर केली असली, तरी तो एकदिवसीय आणि टी-२० प्रकारात खेळणार आहे. जगभरातील दिग्गज फलंदाजांना स्टेनने आपल्या धारधार गोलंदाजीने जेरीस आणले आहे. मात्र, मागील काही महिन्यांपासून स्टेनला दुखापतीने ग्रासले आहे. नुकत्याच झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत दुखापतीमुळे स्टेनने स्पर्धेतून माघार घेतली होती.