मुंबई - भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका व्यावसायिकाने हरभजनला चार कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामुळे हरभजनने चेन्नई सिटी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजनने एका मित्राच्या मध्यस्थीवरुन, व्यावसायिक जी. महेश याला २०१५ मध्ये चार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. कालावधी संपल्यानंतर हरभजनने महेशकडे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महेशने मागील महिन्यात हरभजनला २५ लाख रुपयांचा चेक दिला.
हरभजनने तो चेक बँकेत जमा केला असता, महेशच्या खात्यात पैसे नसल्याने तो चेक बाऊन्स झाला. यानंतर हरभजनने महेशला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने हरभजनला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हरभजनने चेन्नई पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गणेशला समन्सही बजावले आहेत.