दुबई - आयपीएलसाठी यूएई गाठलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या अडचणीत वाढ झाली आहे. सीएसकेने १२ सदस्यांच्या कोरोना पॉझिटिव्ह घटनेची पुष्टी केल्यानंतर संघाला अजून एक मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा डावखुरा फलंदाज आणि संघातील महत्त्वाचा खेळाडू सुरेश रैना वैयक्तिक कारणामुळे मायदेशी परतला आहे. त्यामुळे तो यंदाच्या आयपीएलमध्ये भाग घेऊ शकणार नाही. सीएसकेच्या संघव्यवस्थापनाने ही माहिती दिली.
माध्यमांच्या वृत्तानुसार, पठाणकोटच्या थरियल गावात मध्यरात्री रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला झाला. या हल्ल्यात रैनाच्या आत्याच्या पतीचा (अशोक कुमार) मृत्यू झाला. तर, रैनाची आत्या आशा देवी गंभीर जखमी झाल्या असून त्या सध्या रूग्णालयात आहेत. रैनाचा चुलत भाऊ कौशल कुमार (32) आणि अपिन कुमार (24) हे सुद्धा जखमी झाले आहे. मात्र, या प्रकरणात रैनाकडून अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. अज्ञात हल्लेखोरांनी रैनाच्या नातेवाईकांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे.