नवी दिल्ली -बर्याच चढ-उतारानंतर इंडियन प्रीमियर लीगचा नवा हंगाम यूएईमध्ये सुरू होणार आहे. आयपीएलमध्ये खेळत असलेल्या खेळाडूंना चाहत्यांची अनुपस्थिती जाणवेल, तर दिग्गज खेळाडूंची उपस्थिती या स्पर्धेची शान वाढवेल. जवळपास प्रत्येक संघात असे खेळाडू असतात, ज्यांना खेळताना पाहण्यासाठी चाहते आयपीएलसाठी आतुरलेले असतात. यावर्षी आयपीएलच्या आयोजनाच्या पद्धतीत बदल झाला असला, तरी या खेळाडूंमुळे आयपीएलच्या प्रसिद्धीत घट झालेली नाही.
असे हे अनुभवी आणि मुरलेले खेळाडू लोकांचे किती काळ मनोरंजन करतील, हे सांगणे कठीण आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर काळच देईल. आयपीएलमध्ये असे खेळाडू आहेत, जे यंदा निरोप घेऊ शकतात.
महेंद्रसिंह धोनी -
यंदाच्या स्वातंत्र्यदिनी भारताचा महान क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. अनेक चाहते या घटनेतून अजुनही सावरलेले नाहीत.
३९ वर्षीय धोनी अनेकदा त्याच्या निर्णयाने सर्वांना चकित करतो. धोनी अजून आयपीएलचे २-३ हंगाम खेळेल, असे चेन्नई सुपर किंग्जने सांगितले असले तरी, अंतिम निर्णय धोनीचा असेल. त्यामुळे यंदाचा हंगाम कदाचित धोनीच्या कारकिर्दीचा शेवटचा हंगाम असू शकतो. सीएसकेमध्ये आपले स्थान घेण्यासाठी धोनी योग्य खेळाडू शोधत असल्याचेही वृत्त त्याचा संघसहकारी ब्राव्होने माध्यमांना दिले होते.