नवी दिल्ली -आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा सलामी फलंदाज मनदीप सिंग 'बाबा' झाला आहे. मनदीपची पत्नी जगदीप जयस्वालने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. युकेमध्ये वास्तव्यास असलेल्या जगदीपला अनेक वर्षे डेट केल्यानंतर मनदीपने २५ डिसेंबर २०१६ मध्ये तिच्याशी लग्न केले.
हेही वाचा - "माझे बाबा, माझे हिरो...'', वडिलांच्या निधनानंतर हार्दिकने लिहिली भावनिक पोस्ट
इन्स्टाग्राम पोस्टवरून मनदीपने घरातील नव्या पाहुण्याची बातमी दिली. मनदीप-जगदीपने आपल्या मुलाचे नाव राजवीर सिंग असे ठेवले आहे. मनदीप सध्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत पंजाब संघाचे नेतृत्व करत आहे. किंग्ज इलेव्ह पंजाबनेही मनदीप-जगदीपच्या नव्या अपत्याची माहिती शेअर केली आहे.
मनदीपची क्रिकेट कारकीर्द -
२९ वर्षीय मनदीप सिंगने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आजवर आयपीएलमध्ये त्याने एकूण १०४ सामने खेळले असून १६५९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ६ अर्धशतकांचा समावेश आहे. जून २०१६ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध त्याने भारतीय टी-२० संघात पदार्पण केले होते. त्यानंतर त्याला केवळ २ सामन्यात संधी मिळाली.