मुंबई - आयपीएल विजेता मुंबई इंडियन्स संघाचा खेळाडू कृणाल पांड्याला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) पथकाने मुंबई विमानतळावर ताब्यात घेतले आहे. कृणाल पांड्याकडे युएईहून येताना सोन्याचे दागिने सापडले. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, युएईहून मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर कृणाल पांड्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. यात सोन्याचे दागिने, ज्यात बांगड्या, मनगटी घड्याळांसह अनेक मौल्यवान वस्तू मिळाल्या. यामुळे महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले.
काय आहे ड्युटी फ्री नियम-
नियमानुसार दुबईतून जर एखादा पुरुष प्रवासी येत असेल तर त्याला त्याच्यासोबत २० ग्रॅम सोनं बाळगण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्याची किंमत ५० हजाराच्या पुढे नसावी, असा नियम आहे. महिला प्रवाशांसाठी ४० ग्रॅम सोने स्वतः सोबत ठेवण्याची परवानगी असून त्याची किंमत १ लाख रुपयांपर्यंतच्या पुढे नसावी, असा नियम आहे. कृणाल पांड्या याची डीआरआय अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असून त्याच्याकडे आढळून आलेल्या सोन्याचे दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या संदर्भातील कागदपत्रांची चौकशी केली जात आहे.