हैदराबाद -भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) भरवशाचा फलंदाज अंबाती रायुडूला मुलगी झाली आहे. एका नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने रायुडू आणि त्याची पत्नी चेनुपल्ली विद्या यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.
सीएसकेने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. रायुडूचा सहकारी सुरेश रैनाने आपल्या शुभेच्छा कळवल्या आहेत. ''अंबाती रायुडू आणि विद्याला शुभेच्छा. हा आशीर्वाद आहे! या लहान मुलीसह प्रत्येक क्षण जगा. देव तुम्हाला प्रेम आणि आनंद देवो'', असे रैनाने ट्विटरवर म्हटले.
रायुडूने भारताकडून 55 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत. मुलीच्या जन्माच्या खास प्रसंगी चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. याशिवाय, आई आणि मुलीच्या सुरक्षेसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. 2009 मध्ये विद्या आणि रायुडूचे लग्न झाले होते.
रायुडूने मार्च 2019 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर रायुडूला संघात स्थान मिळालेले नाही. 2019 च्या वर्ल्डकप संघात त्याची निवड झाली नाही, तेव्हा तो निराश झाला होता. त्याने निवृत्तीची घोषणा देखील केली होती. मात्र, एका महिन्यानंतर तो क्रिकेटमध्ये परतला. त्यानंतर त्याने हैदराबादकडून घरगुती क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.