ख्राईस्टचर्च -पहिल्या कसोटीतील खराब फलंदाजीनंतर दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाज धावा रचण्यात अपयशी ठरले आहेत. ख्राईस्टचर्च येथे आजपासून सुरू झालेल्या अंतिम आणि दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडसमोर हाराकिरी पत्करली. पहिल्याच दिवशी भारताने आपले सर्व फलंदाज २४२ धावात गमावले. मागील काही सामन्यापासून खराब फॉर्मशी झुंजत असलेला भारताचा कर्णधार विराट या डावातही अपयशी ठरला.
हेही वाचा -अवघ्या १२ धावात घेतले १० बळी...पाहा व्हिडिओ
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकांमुळे भारताला ६३ षटकात २४२ धावा करता आल्या. पृथ्वीने ८ चौकार आणि एका षटकारासह ५४, पुजाराने ६ चौकारांसह ५४ आणि विहारीने १० चौकारांसह ५५ धावा केल्या. विराट कोहली या डावातही अपयशी ठरला. त्याला ३ धावांवर साऊदीने पायचित पकडले. तर, अजिंक्य रहाणे साऊदीच्याच गोलंदाजीवर ७ धावांवर माघारी परतला. यजमान संघाकडून जेमिसनने ५, टीम साऊदी-ट्रेंट बोल्टने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला.
भारताच्या डावानंतर, न्यूझीलंडने फलंदाजीला सुरूवात केली आहे. टॉम लॅथम २७ तर, टॉम ब्लंडेल २९ धावांवर खेळत असून न्यूझीलंडच्या बिनबाद ६३ धावा झाल्या आहेत.