रायपूर -रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये भारताचा युवराज सिंहने स्फोटक फलंदाजीचा नजराणा पेश केला. त्याने शनिवारी झालेल्या सामन्यात इंडिया लिजेड संघाकडून खेळणाना सलग चार षटकार ठोकत २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इंग्लंडविरुद्धच्या आठवणी ताज्या केल्या. दक्षिण आफ्रिका लिजेड संघाविरुद्ध युवीने २२ चेंडूंत नाबाद ५२ धावांची खेळी केली. यासोबत त्याने गोलंदाजीत दोन विकेट देखील घेतल्या. युवराजच्या या कामगिरीच्या जोरावर इंडिया लिजेडने या स्पर्धेत पाचवा विजय मिळवला. इंडिया लिजेडने हा सामना ५६ धावांनी जिंकला. तर अष्टपैलू कामगिरी नोंदवणारा युवराज सामनावीर ठरला.
दक्षिण आफ्रिका लिजेडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा युवराज (५२) आणि सचिन (६०) च्या खेळीच्या जोरावर इंडिया लिजेडने २० षटकांत ३ बाद २०४ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात सचिन तेंडुलकरने ३७ चेंडूंत ९ चौकार व १ षटकारासह ६० धावा केल्या. एस बद्रीनाथने ३४ चेंडूत ४ चौकार व २ षटकारांसह ४२ धावा केल्या. युसूफ पठाण यानेही १० चेंडूंत २ चौकार व २ षटकारासह २३ धावा झोडपल्या.