सिडनी - भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी मोहम्मद सिराजवर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टीका केली. तेव्हा सिराजने थेट पंचांकडे तक्रार केली. यानंतर पोलिसांना बोलावून सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, या प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल भारतीय संघाची माफी मागितली आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले की, ‘अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. आयसीसी या प्रकरणाचा तपास करत आहे. दोषी प्रेक्षकाची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. यात त्यांच्यावर आजीवन बंदी घातली जाईल. या प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.’
क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्धीपत्रक.... दरम्यान, सामन्याच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराह यांना वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला होता. यानंतर दोघांनी याची माहिती कर्णधार अजिंक्य रहाणे याला दिली. तेव्हा रहाणेने ही बाब प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या कानावर घातली. नंतर बीसीसीआयने या प्रकरणाचा तपास आयसीसीने सुरू केल्याचे सांगितले. चौथ्या दिवशीही असाच प्रकार घडला. तेव्हा सिराजने त्वरित मैदानावरील पंचाकडे याची तक्रार केली. तेव्हा पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि सिराजने सांगितलेल्या स्टँडमधून सहा प्रेक्षकांना बाहेर पाठवण्यात आले.
हेही वाचा -IND vs AUS : चौथ्या कसोटीसाठी जडेजाची जागेवर 'या' खेळाडू लागू शकते वर्णी
हेही वाचा -Ind vs Aus : सिराजवर पुन्हा वर्णद्वेषी टीका; तक्रार करताच पोलिसांनी प्रेक्षकांना मैदानाबाहेर हाकललं