मुंबई- लॉकडाऊनच्या काळात खेळाडूंसह सामान्य नागरिक आपापल्या घरीच आहेत. अशात भारतीय महिला क्रिकेट संघातील एका खेळाडूचा डान्सचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे.
भारतीय संघातील खेळाडू वेदा कृष्णमूर्तीचा हा व्हिडिओ असून ती यात भन्नाट डान्स करताना पाहायला मिळत आहे. स्वत: वेदानेच तिच्या डान्सचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना तिने, लॉकडाऊन मूव्ह्ज असे असू शकतात, असे म्हटले आहे.
महत्वाची बाब म्हणजे, वेदाच्या डान्सचे सोशल मीडियावर सर्व जण कौतुक करत आहेत. या व्हिडिओला एक लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या प्रसारामुळे अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवला आहे. देशात कोरोनाचे ८३५६ रुग्ण आढळून आले आहेत. तर २७३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार यांच्याकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहेत. शासनाकडून घराबाहेर पडू नका, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लढ्यात मदत करा, असे आवाहन केले आहे.
मोदींच्या या आवाहनाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आयपीएलमधील संघ सनरायझर्स हैदाराबादने कोरोना लढ्यात १० कोटीची मदत केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघानेही (एआयएफएफ) पंतप्रधान मदत निधीसाठी २५ लाखांची मदत दिली आहे. कोलकाता येथील फुटबॉल क्लब मोहन बागाननेही २० लाख रुपये दिले आहेत. याशिवाय सचिन तेंडुलकर, सुनिल गावसकर, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी. व्ही. सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, केदार जाधव, हरभजन सिंग, युवराज सिंह, हिमा दास, इरफान पठाण, युसूफ पठाण, चेतेश्वर पुजारा, अर्जुन भाटी, अभिमन्यू ईश्वरण आदींनी देखील मदत दिली आहे.
हेही वाचा -विस्डेन २०१९ च्या यादीत रोहितचा समावेश नसल्याने लक्ष्मण यांनी व्यक्त केले आश्चर्य
हेही वाचा -क्रिकेटपटू 'अभिमन्यू' गरिबांच्या मदतीला धावला, घेतली १०० कुटुंबीयांची जबाबदारी