मुंबई- कोरोनामुळे सध्या परिस्थिती बिकट होत चालली आहे. यामुळे क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळाडू सोशल मीडियावरून लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत. पण लोकांचा रस्त्यावर वावर सुरूच आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली आहे. यालाही लोक जुमानत नसल्याने, महाराष्ट्र पोलिसांनी त्यांचा खाक्या दाखवत घराबाहेर पडणाऱ्यांना दंडूक्याने प्रसाद देणं सुरू केलं आहे. तर दुसरीकडे, उत्तर प्रदेश पोलिसांनी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक फोटो वापर करून लोकांना घरी राहण्याचा सल्ला दिला आहे.
उत्तर प्रदेश पोलिसांनी आपल्या 'कॉल ११२' या ट्विटर अकाउंटवरुन धोनीचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेच्या सेमीफायनलचा आहे. भारताचा या सामन्यात न्यूझीलंडविरुद्धने पराभव केला होता. धोनी या सामन्यात धावबाद झाला होता. धोनी धावबाद होतानाचा फोटो उत्तर प्रदेश पोलिसांनी वापरला आहे. हा फोटो शेअर करताना पोलीस म्हणतात, 'उस दिन भी यही ख्याल आया था कि काश अंदर होते।'