मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे. भारतीय फलंदाज सुरेश रैनानेही मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मोदींच्या घोषणेनंतर सुरेश रैनाने ट्विट करुन मोदींच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तो म्हणतो, 'कोरोना विषाणू विरोधातील लढा आपल्याला जिंकायचे आहे. चला, वाढीव लॉकडाउनपर्यंत म्हणजेच ३ मे पर्यंत आपण घरात राहून साऱ्यांना सुरक्षित ठेवूया. तसेच पंतप्रधान मोदी यांनी सांगितलेले आरोग्यसेतु अॅपदेखील डाउनलोड करूया. या अॅपचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल. मी हे अॅप आधीच घेतले आहे. तुम्हीही घ्या. यामुळे आपण सुरक्षित राहू.'
देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी २४ मार्च रोजी २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला होता. हा लॉकडाऊन आज संपणार होता. पण मोदी यांनी आज देशाला संबोधित करताना कोरोनाचा अजूनही पूर्णपणे खात्मा शक्य झाला नसल्याने हा लॉकडाउन ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केली.