मुंबई- पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी सद्या एका चांगल्या कामासाठी चर्चेत आला आहे. तो नेहमी भारतामध्ये सर्वात जास्त ट्रोल होत असतो. पण आता त्याने माणूसकीच्या नात्याने केलेले काम पाहून त्याचे कौतुक भारतातील काही लोकं करत आहेत. शाहिद कोरोनाग्रस्ताच्या मदतीसाठी पुढे सरसावला आहे. त्याने आपल्या परिसरातील गरीब आणि गरजू व्यक्तींसाठी मोफत अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचे मोफत वाटप केले आहे. तसेच त्याने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन कुटुंबीयांना मदत केल्याची माहिती दिली.
आफ्रिदी आपल्या संस्थेच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचे मोफत वाटप करत आहे. या कामासाठी तो 'डोनेट करो ना' हे अभियान चालवतो आहे. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केले. आफ्रिदीने आपल्या या मदतकार्याचे फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.
आफ्रिदीच्या या कामाचे कौतूक भारताचे माजी क्रिकेटपटू युवराज सिंह आणि हरभजन सिंग यांनी केले आहे. पण या दोघांनी केलेले कौतूक भारताच्या काही नेटीझन्सना आवडलेले नाही. त्यांनी या विषयावरुन दोघांना ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. याशिवाय भाजपचे आमदार राम कदम यांनी युवी आणि हरभजन यांना आपले विधान मागे घ्या, असे सांगितले आहे.