मुंबई- भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहने कोरोना लढ्यासाठी मोठी मदत दिली आहे. त्याने पंतप्रधान सहायता निधीला, ५० लाख रुपये देणार असल्याची घोषणा केली आहे. युवीने ही माहिती त्याच्या ट्विटर अकाउंटवरुन दिली. यासोबत त्याने, आज रात्री ९ वाजता ९ मिनिटासाठी मेणबत्ती पेटवून एकता दाखवण्याचे आवाहन केले आहे.
युवराजने या संदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'मी आज रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी मेणबत्ती पेटवणार आहे. काय तुम्ही माझ्यासोबत आहात का? आजच्या दिवशी मी पंतप्रधान सहायता निधीसाठी ५० लाख रुपयांचे दान देत आहे. तुम्हीही आपापल्या परीने मदत करा.'
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (ता.५ एप्रिल) रात्री नऊ वाजता ९ मिनिटांसाठी घरातील विजेची उपकरणे बंद करा आणि दिवे, मेणबत्ती किंवा मोबाईलचा फ्लॅश ऑन करा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन देशवाशियांना केले आहे. युवराजने मोदींच्या आवाहनाला पाठिंबा देत याबाबत चाहत्याला आवाहन केले आहे.