कराची- कोरोना विषाणू लोकांना कंगाल करून सोडणार, असे मत पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले आहे. कोरोनामुळे जगभरातील व्यवहार ठप्प आहेत. संपूर्ण जगात मंदीचे सावट आहे. अशात शोएबने आपले मत मांडले.
शोएबने बुधवारी ट्विटच्या माध्यमातून सांगितले की, कोरोना विषाणूमुळे लोकांचे जीव जात आहेत, पण त्यापेक्षा जास्त लोक कर्जबाजारी होतील.
दरम्यान, चीनच्या वुहान शहारातून जगभरात पसरलेल्या कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. पाकिस्तानलाही कोरोनाचा फटका चांगलाच बसलेला आहे. कारण त्यांना पाकिस्तान सुपर लीगचे काही सामने रद्द करावे लागले आहेत. याशिवाय पाकमधील सर्व व्यवहार ठप्प आहेत.
कोरोना विषाणूसाठी शोएबने काही दिवसांपूर्वी चीनला दोषी ठरवले होते. तुम्ही वटवाघूळ आणि माकड यासारखे प्राणी कसे काय खाऊ शकता, असा सवाल त्याने उपस्थित केला होता. यासोबत त्याने लोकांना घरीच राहण्याचेही आवाहन केलेले आहे.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहीद आफ्रिदी आपल्या संस्थेच्या माध्यमातून कोरोना पीडित आणि गरजू व्यक्तींना अन्न आणि वैद्यकीय गोष्टींचे मोफत वाटप करत आहे. या कामासाठी तो 'डोनेट करो ना' हे अभियान चालवतो आहे. या अभियानाअंतर्गत आफ्रिदीने पाकिस्तानातील हिंदू आणि ख्रिश्चन वस्त्यांमधील गरजू व्यक्तींना अन्नदान केले. आफ्रिदीने आपल्या या मदतकार्याचे फोटो ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत. याकामी आफ्रिदीने शोएबला मदत करण्याचे आवाहन केले तेव्हा शोएबने त्याला मदतीसाठी प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा -युवीसह हरभजनचा पाक क्रिकेटपटूला पाठिंबा; भाजप आमदाराने केली विधान मागे घेण्याची मागणी
हेही वाचा -हरभजन पाकिस्तानला म्हणतोय 'पंगा मत लेना', शेअर 'तो' व्हिडिओ