मुंबई- कोरोना विषाणूचा भारतात झपाट्याने प्रसार होत असून याला रोखण्यासाठी सर्वांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करावं, असे आवाहन भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलं आहे. मात्र, या आवाहनानंतर नेटिझन्सनी विराटलाच ट्रोल केलं आहे. तू आधी मदत निधी दे आणि तुझे ज्ञान वाट, असा सल्ला नेटिझन्सनी विराटला दिला आहे.
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी भारताचा माजी मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकर, कुस्तीपटू बजरंग पुनिया, भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर, बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू यांनी मदत जाहीर केली आहे. पण, अद्याप विराट कोहलीने कोणतीही मदत दिलेली नाही. यामुळे नेटिझन्स विराटवर भडकले आहेत.
एका चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले आहे की, 'तुझी कमाई ९०० करोडहून अधिक आहे. या देशाने तुला भरभरुन प्रेम दिलं. आता याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. गरीब आणि गरजूंसाठी काही दान कर.'
दरम्यान, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी श्रीलंका बोर्डाने १ कोटी रुपयांची देणगी दिली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी ५० लाख तर बांगलादेशच्या खेळाडूंनी २८ लाख जाहीर केले आहेत. पण अद्याप २२०० कोटीहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या तसेच जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड, अशी ओळख असलेल्या बीसीसीआयने आर्थिक मदत जाहीर केलेली नाही.
कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसांगणिक वाढ होत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील करोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देभशरात ७५ रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
हेही वाचा -Coronavirus : हिटमॅन रोहित म्हणतो, आधी देश महत्त्वाचा, आयपीएलचा विचार नंतर...
हेही वाचा -'कर्फ्यू काळात मजा-मस्तीसाठी रस्त्यावर उतरणे, याला देशाशी प्रामाणिक राहणे म्हणत नाहीत'