मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारताचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने, कोरोनाविरोधातील लढ्यात आपले योगदान दिले. रैनाने एकूण ५२ लाख रुपयांची मदत केली. यावर पंतप्रधान मोदींनी रैनाचे आभार आगळ्यावेगळ्या पद्धतीने मानले आहे.
सुरेश रैनाने पंतप्रधान सहायता निधीमध्ये ३१ लाख तर उत्तर प्रदेश सरकारच्या मुख्यमंत्री सहायता निधीला २१ लाखांची रक्कम दिली. याशिवाय त्याने कोरोनाविरोधातील लढ्यात, आपण सर्वांनी आपल्याला जमेल तितकी रक्कम दान करावी, असे आवाहन ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी सुरेश रैनाचे आभार मानण्यासाठी एक ट्विट केले आहे. त्यात त्यांनी रैनाचे कौतुक करताना, हे एक उत्तमरित्या झळकावलेले अर्धशतक आहे, असे म्हटलं आहे.
दरम्यान, सुरेश रैना नुकताच एका मुलाचा बाप झाला आहे. रैनाची पत्नीने २३ मार्च रोजी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. याआधी रैना दाम्पत्याला एक मुलगी आहे. तिचे नाव ग्रेसिया असे आहे तर मुलाचे नाव त्यांनी रियो असे ठेवले आहे.