मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशातील विविध क्षेत्रातील ४० खेळाडूंशी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. विराट कोहली, पी.व्ही. सिंधू, सचिन तेंडुलकर यांच्यासह अनेक खेळाडूंचा त्यात सहभाग होते. कोरोनावर मात करायची असून त्यासाठी तुम्ही जनतेचे मनोबल वाढवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोनाविरोधातील लढय़ासाठी जनजागृती मोहिमेत क्रीडापटूंनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर -
कोरोनाविरुद्ध संपूर्ण देशाला एकत्रितपणे लढावे लागणार आहे. आपली खरी लढाई १४ एप्रिलनंतर आहे. आपण लॉकडाऊन संपल्यानंतर निश्चिंत राहू शकत नाही. उलट यानंतरचा काळ निर्णायक असणार आहे, असे सचिनने या बैठकीत सांगितले आहे.
टेनिसपटू अचंता शरथ
कोरोनाविरुद्धची लढत जिंकण्यासाठी आपल्याला विराटप्रमाणे झुंजार वृत्तीची आवश्यकता आहे, असे पंतप्रधान म्हणाल्याचे टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमालने सांगितले.
पंतप्रधानांशी चर्चेत सामील झाल्याची कबुली बीसीसीआयचे अध्यक्ष गांगुली यांनी ही दिली. परंतु त्यांनी तपशील सांगण्यास नकार दिला.
बॅडमिंटनपटू साईप्रणीत-
जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील कांस्य पदक विजेता बी. साईप्रणितने बैठकीनंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात तो म्हणतो, 'मोदी यांनी दिलेल्या सूचनांची नोंद घेण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट संघ जसा प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध लढतो, तसाच आपण कोरोनाविरुद्ध लढा देऊ. तुमच्या प्रेरणेने भारत या आव्हानावर मात करेल, असा मला विश्वास आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्यासह देशातील खेळाडूंशी शुक्रवारी सकाळी ११ वाजता जवळपास एक तास व्हिडीओ कॉलद्वारे चर्चा केली. यात त्यांनी, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा यांच्यासह पी. टी. उषा, पुलेला गोपीचंद, विश्वनाथन आनंद, हिमा दास, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू या नामांकित क्रीडापटूंशी बातचित केली.