मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर देशातल्या विविध क्षेत्रातील ४० खेळाडूंची, व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून बैठक घेतली. यात त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासह अन्य खेळाडूंशी चर्चा केली. कोरोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी मोदींनी खेळाडूंना मदत मागितली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच देशातील क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या लोकांशी संवाद साधला. त्यांनी सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, युवराज सिंग, चेतेश्वर पुजारा यांच्यासह पी. टी. उषा, पुलेला गोपीचंद, विश्वनाथन आनंद, हिमा दास, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू या नामांकित क्रीडापटूंशी चर्चा केली.
मोदींनी, या बैठकीत कोरोनामुळे भारतात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी क्रीडाविश्वाची साथ मागितली आहे. दरम्यान, भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. देशात कोरोना रुग्णांचा संख्या २ हजारांवर पोहोचली आहे. यामुळे केंद्र आणि राज्य सरकार आपापल्या परीने, यावर उपाययोजना करत आहेत.