मुंबई- लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांच्या मदतीला अनेक संस्था, सरकार काम करत आहेत. भारतीय संघाचा फिरकीपटू शाहबाज नदीम ही गरजू मजूरांच्या मदतीला धावला आहे. धनबाद येथील झाहीरा भागातील ३५० गरीब कुटुंबांना मदत करण्याचा संकल्प केला आहे. त्याने आतापर्यंत २५० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू पुरवल्या आहेत.
याविषयी नदीमने सांगितले की, 'आम्ही आजघडीपर्यंत जवळपास २५० कुटुंबापर्यंत मदत पोहोचवली आहे. येत्या काही दिवसांत, आणखी कुटुंबाना मदत करण्याचा आमचा संकल्प आहे.'
दरम्यान, याआधी नदीम व्यतिरिक्त सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, गौतम गंभीर, अजिंक्य रहाणे, बजरंग पुनिया, पी व्ही सिंधू, मेरी कोम, मिताली राज, रोहित शर्मा, विराट कोहली, पूनम यादव, दीप्ती शर्मा, इशान पोरेल यांनी आर्थिक मदत केली आहे.