मुंबई- कोरोनाच्या संकटामुळे काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवला आला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूंराच्या यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. अशा गरीब लोकांना मदत करण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. भारतीय ए संघातील सलामीवीर आणि पश्चिम बंगाल संघाचा कर्णधार अभिमन्यू ईश्वरण याने डेहराडूनमधील गरीब लोकांना मदत केली.
अभिमन्यूने गरीब लोकांसाठी २.५ लाख रुपयांची मदत जाहीर केली असून त्याने ही मदत पोलिसांकडे सोपवली आहे. याशिवाय तो १०० हून अधिक लोकांच्या घरी अन्न-धान्य पोहोचवत आहे. याविषयी सांगताना ईश्वरण म्हणाला, 'डेहराडूनच्या पोलिसांकडे मी २.५ लाख दिले आहेत. जे मजूर अडकले आहेत त्यांना अन्न-धान्याची सोय यातून केली जाईल.'
दरम्यान, अभिमन्यूच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगला संघाने यावर्षीच्या रणजी करंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. पण फायनलमध्ये त्यांचा सौरष्ट्रकडून पराभव झाला. पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सौराष्ट्र संघाला विजय मिळाला.