दुबई- कोरोना विषाणू धसका आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही घेतला आहे. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे, आयसीसीने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' करण्यास सांगितलं आहे. तसेच आयसीसीने यापुढील बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनामुळे क्रिकेट स्पर्धा तसेच मालिकांवर झालेल्या परिणामासंदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. ही बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे होणार आहे. आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साह ही बैठक घेणार आहेत. दरम्यान आयसीसीने ही बैठक कधी होणार, याबद्दलची माहिती दिलेली नाही.
आयसीसीच्या प्रवक्त्याने पीटीआयशी बोलताना सांगितलं की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे जगभरात वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितलं जात आहे. या निर्देशांचे पालन आयसीसीचे अधिकारी करत आहेत. सर्व सदस्यांच्या आम्ही संपर्कात असून संस्थेचे बहुतांश कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत आहेत.'