मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनावर देशवासियांनी रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटासाठी लाईट बंद करुन दिवा, मेणबत्ती, टॉर्च आणि मोबाईल फ्लॅश दाखवून कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपली एकता दाखवली. पण काही लोकांनी फटाके फोडले. या फटाके फोडणाऱ्यांवर, भारतीय संघाचा माजी सलामीवर आणि भाजपचा विद्यमान खासदार गौतम गंभीरसह, इरफान पठाण आणि आर. अश्विन यांनी नाराजी व्यक्त केली.
गंभीरने या संदर्भात ट्विट केले आहे. त्यात तो म्हणतो, 'भारतीयानों घरात राहा, अजून लढाई संपलेली नाही. हा वेळ फटाके फोडण्याचा नाही.'
दरम्यान, गंभीर व्यतिरिक्त फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण यांनीही फटाके फोडणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.
अश्विनने, मला या गोष्टीचे आश्चर्य वाटते की लॉकडाऊन असताना लोकांनी फटाके कोठून व कधी खरेदी केली. हा मोठा प्रश्न आहे, असे म्हटले आहे. तर इरफानने सगळ ठीक होतं पण फटाके फोडायला नको होते, असे मत व्यक्त केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे, कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला क्रीडा विश्वातून चांगला प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा -लढा कोरोनाशी : मोदींच्या आवाहनाला क्रीडा क्षेत्रातून प्रतिसाद, खेळाडूंनी केली दिव्यांची आरास
हेही वाचा -लॉकडाऊनमध्ये 'फुलराणी' काय करते?, पहा व्हिडिओ