मुंबई- कोरोनामुळे आयपीएल स्पर्धा रद्द झाली तर बीसीसीआयसह आठ संघांना कोट्यवधींचे नुकसान होऊ शकते. सध्या आयपीएल स्पर्धा कधी होणार याची निश्चिती नाही आणि याचा पहिला फटका एका संघाला बसला आहे. राजस्थान संघाने दुबई एक्स्पोसोबत जर्सीसाठी करार केला होता. पण दुबई एक्स्पोने स्पॉन्सरशिप डील रद्द केली आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान रॉयल्स संघाने या वर्षी २१ जानेवारीला दुबई एक्स्पो सोबतच्या कराराची घोषणा केली होती. २५ कोटींचा हा करार एका वर्षासाठी होता. या करारानुसार वर्ल्ड एक्स्पो हा खेळाडूंचा मुख्य स्पॉन्सर होता आणि राजस्थानच्या खेळाडूंच्या जर्सीवर समोरच्या बाजूला दुबई एक्स्पो असे लिहले जाणार होते. पण दुबई एक्स्पोने स्पॉन्सरशिप डील रद्द केली आहे. यामुळे राजस्थान रॉयल्सला २५ कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
दुबई एक्स्पोसोबतचा करार रद्द झाल्याने आता राजस्थान रॉयल्स संघाकडे जर्सीसाठी स्पॉन्सर नाही. दरम्यान, दुबई एक्स्पोने या वर्षासाठी करार रद्द केला असला तरी ते पुढच्या वर्षी पुन्हा स्पॉन्सर म्हणून येतील, असा विश्वास राजस्थान संघाला आहे.