रायपूर - रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजमध्ये रविवारी श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यातील सामना पार पडला. हा सामना मैदानावर पाहिलेल्या दोन प्रेक्षकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे या स्पर्धेवर अनिश्चिततचे सावट आहे.
रायपुरच्या शहिद वीर नारायण सिंह आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना मैदानावर येण्याची मुभा देण्यात आली आहे. रविवारी श्रीलंका आणि इंग्लंड यांच्यात सामना पार पडला. हा सामना मैदानावर पहिलेल्या दोन प्रेक्षकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
दरम्यान, या स्पर्धेत विविध देशाचे दिग्गज खेळत आहेत. त्या खेळाडूंना पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी मैदानावर होत आहे. इंडिया लिजेड्सच्या सामन्याला तर ४० हजाराहून अधिक प्रेक्षकांनी मैदानात हजेरी लावली होती. अशात आता कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने, या स्पर्धेवर अनिश्चततेचे सावट निर्माण झाले आहे.
सोमवारी प्रेक्षकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच, प्रशासनाने तात्काळ बैठक घेत आढावा घेतला. तसेच उर्वरित सामन्यासाठी कोरोना गाईडलाइनचे सक्तीने पालन करण्यासंदर्भात सूचना केल्या. दरम्यान, त्या दोन्ही प्रेक्षकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.