मुंबई - मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला, अशा शब्दांत भारताचा मास्टर ब्लास्टर खेळाडू सचिन तेंडुलकरने मुंबई संघाचे कौतुक केले. मंगळवारी दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या, आयपीएल २०२०च्या अंतिम सामन्यात मुंबईने दिल्ली संघाचा ५ गडी राखून पराभव करत जेतेपद पटकावले. या विजयानंतर सचिनने ही प्रतिक्रिया दिली.
मुंबईच्या विजयावर सचिनने एक ट्विट केले आहे. मुंबईच्या खेळाडूंनी अफलातून विजय मिळवला. अंतिम सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व गाजवले. खेळाडूंसोबतच सपोर्ट स्टाफचेही कौतुक. मागील वर्षी ज्या पद्धतीची कामगिरी केली होती, त्याच प्रकारची कामगिरी यंदाही केल्याने संघाला विजय मिळवणे सोपे गेले, असे सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे.
अंतिम सामन्याआधी सचिनने मुंबई संघासाठी खास संदेश दिला होता. यात त्याने, मुंबईसाठी तुम्ही जेव्हा मैदानावर खेळायला उतरता, तेव्हा तुम्ही केवळ एक व्यक्ती नसता, तर संपूर्ण उर्जेचा समूह असता. सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबईचा संघ म्हणजे एक कुटुंब असल्याचे सांगत, संघाच्या चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये आपण सगळे एकमेकांच्या सोबत असतो. त्यामुळे सर्वस्व पणाला लावून खेळा, असा सल्ला दिला होता.