लंडन -यंदाचा एकदिवसीय विश्वकरंडक जिंकलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट संघाने आपला मुख्य प्रशिक्षक बदलला आहे. इंग्लंडच्या गोलंदाजीचे प्रशिक्षक असलेले ख्रिस सिल्व्हरहूड यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि २०११ साली भारताला विश्वकरंडक जिंकवून देणाऱ्या गॅरी कर्स्टन यांची संधी मात्र हुकली आहे.
हेही वाचा -'आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी तयार राहा', सचिनचा रहाणेला गमतीशीर सल्ला
सोमवारी ख्रिस सिल्व्हरहूड यांच्या नावाची इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घोषणा केली. यंदाच्या अॅशेस मालिकेनंतर, ट्रेव्हर बेलिस यांचा प्रशिक्षक म्हणून करार संपला होता. त्यामुळे सिल्व्हरहूड आता बेलिस यांची जागा घेतील. सिल्व्हरहूड यांच्या सोबत गॅरी कर्स्टन आणि अॅलेक स्टीवर्ट हे दिग्गज माजी खेळाडू मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीत होते. मात्र, शेवटी सिल्व्हरहूड यांनी बाजी मारली आहे.
४४ वर्षीय सिल्व्हरहूड यांनीही मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल आनंद आणि अभिमान वाटत असल्याचे म्हटले आहे. 'देशात गुणी खेळाडू मोठ्या प्रमाणात आहेत. आगामी न्यूझीलंड आणि आफ्रिका दौऱ्यावर सकारात्मक कामगिरी करु', असे सिल्व्हरहूड यांनी म्हटले आहे. सिल्व्हरवूड यांनी इंग्लंडकडून १९९६ आणि २००२ दरम्यान ६ कसोटी सामने आणि ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. कसोटीत त्यांनी २९ धावा आणि ११ बळी मिळवले आहेत. तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांनी ६ बळी घेतले आहेत.